श्याम मनोहर यांची कादंबरी, “आहाहा” - भाग १ ते ५
“आहाहा” चा पहिला भाग...
श्याम मनोहर यांची सकाळ मध्ये प्रकाशित होणारी कादंबरी, “आहाहा” याचा पहिला भाग वाचला…
कथानक, व्यक्तिरेखा याला पूर्णपणे छेद देत, काहीतरी एक पक्का विचार, Stream of Consciousness सारखा मांडत जायचा, अशी त्यांची आधीपासूनची शैली, पुन्हा एकदा या मधेही दिसली.
फक्त आता ते मांडणारे मुद्दे फारसे नवीन वाटत नाहीत. असे मुद्दे रिल्स च्या स्वरूपात, ऑनलाइन पोस्ट च्या स्वरूपात कुणी ना कुणीतरी ऑनलाइन मांडतच असतं. थोडं राजकीय, थोडं तात्विक, थोडं सामाजिक, थोडं भावनिक, किंव्हा सगळं एकत्र असं काही न काही आजुबाजूला पाहण्यात, ऐकण्यात येतच असतं.
बघूया, पुढे कादंबरी कशी जाते ती…
“आहाहा” चा दुसरा भाग... ”शरीर"
कादंबरीच्या दुसऱ्या भागात, शरीराचा जिवंतपणा, चेतना, सजीव असणं म्हणजे काय, निर्जीव असणं म्हणजे काय, अशा बऱ्याच गोष्टींचा stream of consciousness शैलीत ऊहापोह केलाय. मधे मित्राची आई जाण्याचा प्रसंग आहे पण त्याचा उद्देश शरीराच्या जिवंतपणाचा विचार करणे एवढाच आहे.
लेखक एका विषयाला धरून सहजपणे, मुक्तपणे एक विचार प्रवाह घेऊन जसा पुढे जातो तशी कादंबरी/ गोष्ट उलगडत जाते.
पुन्हा एकदा - या मुद्द्याचं फारस अप्रूप वाटत नाही. एकंदर या भागात मांडला जाणारा मुद्दा हा Entropy चा आहे. सजीव - निर्जीव गोष्टींची, विश्वाची Entropy या वर अनेक गोष्टी अनेकांनी म्हणून ठेवल्यात.
तुम्ही २०२६ मध्ये पंचविशी — तिशीत असाल, थोडे सजग असाल, वाचन करणारे असाल, विचार करणारे असाल - तत्वज्ञान — साहित्य —संस्कृती — विज्ञान या गोष्टींचा थोडाफार अभ्यास करणारे असाल तर, कादंबरीच्या या भागात मांडल्या जाणाऱ्या या गोष्टी फारशा नवीन वाटत नाहीत.
कादंबरीचा आकृतीबंध म्हणून दुसऱ्या भागात तरी कादंबरी काही विशेष दिशेने जात आहे असं वाटत नाही...
बघूया, पुढे कादंबरी कशी जाते ती…
“आहाहा” चा तिसरा भाग... ”जिवंतपणावर गोष्ट वगैरे"
कादंबरीचा हा तिसरा भाग पकड घेतो...
जिवंतपणा म्हणजे नेमकं काय यावर लेखक लिहित जातो..
जिवंतपणा जगताना वेगळा जाणवत नाही पण तो संपला की इतरांना जाणवतो... इतर त्याला मृत्यू म्हणतात.
लेखक म्हणतो, "जिवंतपणाला कार्य नसते, पूर्ती नसते. जिवंतपणा आहे, नाही, एवढे असते. शरीराला हालचालींचे व्यसन असते. मन शरीराची फिकीर करीत नाही" अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी समोर येतात.
आंधळा, मुका, कॅन्सरवाला, तरुण, प्रौढ, वृद्ध... प्रत्येकाला जगायचे असते असं लेखक म्हणतो.
लेखक प्रामाणिक पणे मृत्यू या गोष्टीचा ऊहापोह करत राहतो.
हा प्रामाणिकपणा कादंबरीचं मूल्य नक्कीच वाढवतो...
“आहाहा” चा चौथा भाग... ”सभ्यतेचा विस्तार"
कांदबरीच्या चौथ्या भागात लेखक सभ्यतेचा, संस्कृतीच्या विस्ताराचा पट मांडतो. अगदी थोडक्यात पण मानवी उत्क्रांतीच्या प्रवासाकडे तिरकसपणे बघत, शेती पासून ते लोकशाही पर्यंतचा पट लेखक समोर उभा करतो.
शेवटा कडे, लेखक व्यक्तींचे सहा प्रकार मांडतो... त्यामध्ये जगणे साधलेच नाही अशी व्यक्ती हा प्रकार विशेष लक्ष वेधतो.
आपला आशय पोहचविण्याच्या दृष्टीने लेखक विविध शब्द - शब्द प्रयोगांची निर्मिती करतो. हे शब्द नेहमीचेच पण नव्या कॉम्बिनेशन मधे आल्याने बांधून ठेवतात. वेगळ्या प्रकारचा आशय नीट पोहचावा या दृष्टीने जगण्यातील नेहमीची भाषा ही कमी पडत असावी व यावर उपाय म्हणून हे नवनवीन शब्द लेखक वापरत असावा.
या भागात स्त्रीमानव व्यक्ती, पुरुषमानव व्यक्ती, मुलगीमानव व्यक्ती, बापमानव व्यक्ती, झोपउड स्थिती, व्यक्तीलोक असे नवनवीन शब्द तुम्हाला कादंबरीच्या आशयाकडे नव्याने पहायला भाग पडतात.
“आहाहा” चा पाचवा भाग... ”लोककथा"
जगणे म्हणजे दोन घ्यायचे, दोन द्यायचे अशा काहीशा सामान्य माणसाच्या भाषेमध्ये लेखक एकंदर माणसाच्या जगण्याचे सूत्र मांडतो. नोकरी, प्रेम, संसार, मैत्री माणसाच्या जगण्याच्या एकंदर सर्व व्यापामध्ये लेखक जगण्याचं असं काहीसं मजेशीर सूत्र शोधून काढतो. यातून आधीच्या भागात पाडले तसे माणसांचे ते प्रकार ही पाडतो.
Comments
Post a Comment